छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहर मध्यवर्ती भागातील आकाशवाणी रोडवर असलेल्या प्रसिद्ध एशियन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि.४) मध्यरात्री २:२७ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयु) लागलेल्या या आगीमुळे गंभीर परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी देवदूतासारखे धावून जात दाखवलेल्या प्रसंगावधानाने ७ चिमुकल्यांसह तब्बल ५५ रुग्णांना सुखरूप बाहेर काढले.
जवानांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटेच्या गाढ झोपेत सर्वजण असताना सुमारे २:२७ वाजता एशियन हॉस्पिटलच्या एनआयसीयू वार्डामधील एसीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले आणि आग लागली. काही सेकंदांतच एसीने पेट घेतला आणि संपूर्ण वार्डात धुराचे लोट पसरले. धुरामुळे रुग्णांचा गुदमरण्याचा धोका निर्माण झाल्याने रुग्णालयात घबराट आणि पळापळ सुरू झाली. घटनेचे माहिती कळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी तात्काळ सिडको, पदमपुरा आणि एन-९ या तीनही मुख्य केंद्रांवरून अग्निशमन पथकांना घटनास्थळी रवाना केले.
आणि रुग्णांना सुरक्षित बाहेर काढून आग विझविण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले. हे कार्य मुख्य अग्निशमन अधिकारीअशोक एन खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, उप केंद्र अधिकारी लक्ष्मण कोल्हे, ड्युटी अधिकारी रमेश सोनवणे, दीपराज गंगावणे आणि छत्रपती केकान, विशाल निंबाळकर, राम विजय धंदेरवाल, प्रसाद शिंदे, दिनेश मुंगसे, उमेश भोसले, मनसुब सपकाळ, दीपक गाडेकर, नागेश जाधव, शशिकांत गीते, बाळू सपकाळ, रामदास दुधे, बाळू आहेर आणि राजेंद्र बावस्कर, विजय दुबेले, जगदीश गायकवाड, सतीश शेळके, अजय कोल्हे आणि विठ्ठल गावंडे या टीमने प्रयत्न केले.
लहान मुलांसह रुग्णांना सुरक्षित बाहेर
अग्निशमन दलाच्या ५ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करण्यासोबत सर्वात आधी रुग्णांचे प्राण वाचवण्याला प्राधान्य दिले. एनआयसीमध्ये उपचार घेत असलेल्या ७ नवजात बालकांना जवानांनी कौशल्याने आणि सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीचा भडका शेजारच्या वार्डात पसरण्याआधीच जनरल वार्डातील ३० रुग्ण आणि प्रायव्हेट वार्डातील १२ ते १५ रुग्ण अशा एकूण सुमारे ४५ ते ५० रुग्णांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. वेळेवर मिळालेल्या प्रतिसादामुळे आग इतर मजल्यांवर पसरू शकली नाही.
सगळेजण सुरक्षित
हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि बालके सुरक्षित आहेत. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. बालकांना देखील सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. सर्वजण सुरक्षित आहेत. एमजीएम आणि घाटी हॉस्पिटलमध्ये बालकांना पुढील उपचारासाठी दाखल केले असल्याचे एशियन हॉस्पिटलचे डॉ. मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. शोएब हाश्मी यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना सांगितले.















